पिंपरी-चिंचवड येथील डॉ.डी.वाय.पाटील, रुग्णालय यांच्या कडून गोर गरीब रुग्णांची पिळवणूक
संवाददाता, तानाजी केदारी महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२५.९.२०२१.
पिंपरीतील डॉ. डी. वाय पाटील, रुग्णालयाकडून गोरगरीब रुग्णांची लूट; हीच का वैद्यकीय सुविधा, मा.आमदार लक्ष्मण जगतापांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
(पिंपरी चिंचवड) – धर्मदाय रुग्णालय असलेल्या पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील, रुग्णालयात गोरगरीब रुग्णांवर शासनाच्या विविध योजनाअंतर्गत मोफत उपचार होणे कायद्याने बंधनकारक आहे. प्रत्यक्षात नाव मोठे आणि लक्षण खोटे असलेल्या या रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना “तुमची लायकी नाही, तर येता कशाला”, अशा शब्दांत अपमानित केले जाते. धर्मादाय असूनही नामफलकावर तसा कोणताही उल्लेख नाही. रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर खासगी रुग्णालय चालवले जाते. शासनाचे विविध फायदे लाटून रुग्णालय उभारायचे आणि रुग्ण हितापेक्षा धंदा करण्याचा हा सर्व प्रकार धक्कादायक आहे. त्यामुळे गोरगरीबांसाठी हीच का तुमची वैद्यकीय सुविधा?, असा खडा सवाल आमदार मा.लक्ष्मण जगताप,यांनी मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे,यांना विचारला आहे. या रुग्णालयाची चौकशी केल्यास अनेक धक्कादायक प्रकार समोर येतील. त्यासाठी शासनाने इच्छाशक्ती दाखवावी आणि या रुग्णालयात आतापर्यंत किती गोरगरीब रुग्णांवर शासकीय योजनाअंतर्गत मोफत उपचार झाले आहेत?, याची चौकशी करावी. तसेच आतापर्यंतच्या सर्व वैद्यकीय बिलांची शासकीय यंत्रणेमार्फत लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणीही आमदार जगताप,यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.