मराठी

अहमदनगरच्या मतदान संकल्पपत्राची जागतिक विक्रमामध्ये नोंद 25 लाख मतदारांपर्यंत पोहोचले जनजागृती अभियान राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाच्या निवडणूक प्रक्रियेत आदर्श संकल्पना ठरणार!

अहमदनगर प्रतिनिधी :— विलास गिर्‍हे दि.18 – लोकसभा निवडणुकीत स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून संकल्पपत्रांचा विक्रम करणार्‍या अहमदनगर जिल्हा निवडणूक यंत्रणेने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतही पुन्हा या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये भारत निवडणूक आयोगाच्या स्वीप- मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत ‘आमचा संकल्प 100% मतदानाचा’ या घोषवाक्यासह जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सुमारे 25 लाख 46 हजार 792 मतदार नागरिकांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात आले. मुलांचा संकल्प, आई-वडिलांचा संकल्प व सामान्य नागरिकाचा संकल्प अशा विविध प्रकारांमध्ये मतदार जनजागृतीचा उपक्रम संपन्न होत असताना या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मध्ये जागतिक विक्रम म्हणून नोंद झाली आहे. जागतिक विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे प्रमुख पवन सोलंकी यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी व स्विप समितीस प्रदान केले आहे.

आज जिल्हास्तरावर हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी हे प्रमाणपत्र निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर, स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) दिलीप थोरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रमाकांत काटमोरे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, मतदारदूत डॉ.अमोल बागुल, विस्तार अधिकारी रविंद्र कापरे, विनेश लाळगे यांच्याकडे सुपूर्त केले तसेच सर्व स्वीप सदस्य, कॅम्पस अॅम्बॅसिडर, वोट आर्मी आणि या उपक्रमात सक्रीय सर्वांचे अभिनंदन केले. तसेच या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढेल, यासाठी प्रयत्न करावा, असे सांगितले.

राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आदर्श ठरणारी नगर जिल्ह्याच्या संकल्प पत्राची ही संकल्पना भारत निवडणूक आयोग उपसचिव सुजीत कुमार मिश्रा, वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा, उपायुक्त चंद्रा भूषण कुमार, राज्य निवडणूक आयोग अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, स्मार्ट विभाग प्रमुख अर्चना कपूर आदी मान्यवरांनी नुकतीच पुणे येथील यशदा येथे संपन्न झालेल्या कार्यशाळेत गौरवली होती. उपआयुक्त नाशिक विभाग, नाशिक तथा स्वीप मोहिमेचे विभाग निरीक्षक रमेश काळे यांनी देखील या उपक्रमाला राज्यपातळी तथा राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. संकल्प पत्र मोहिमेची पीपीटी स्वीप निरीक्षक समितीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर प्रसारित करण्यात आली आहे.

जिल्ह्यामध्ये सुमारे पाच हजार पेक्षा जास्त शाळांमधील अंगणवाडी पासून ते बारावी पर्यंत साधारणत: नऊ लाख तीस हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्वीप समितीच्या संकल्पपत्र या आगळ्यावेगळ्या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना संकल्प पत्र देण्यात आले होते. सदर संकल्पपत्र विद्यार्थ्यांनी पालकांकडून व घरातील सदस्यांकडून भरून घ्यावयाचे होते. यामध्ये पूर्ण जिल्ह्यातील 20 हजारपेक्षा जास्त शिक्षकांचा देखील समावेश होता.जिल्ह्यातील मतदारांची संख्या 34 लाख 73 हजार 743 एवढी असताना जास्तीत जास्त मतदारांपर्यंत मतदार जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढावी हा या उपक्रमाला पाठीमागचा हेतू होता.

त्याचबरोबर जिल्हाभरामधील विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्थांना देखील संकल्प पत्राचे वितरण करण्यात आले होते. त्यांनी देखील सार्वजनिक ठिकाणी स्टॉल लावून संकल्पपत्र मतदारांकडून भरून घेतले, त्याचबरोबर मतदार सहायता कक्ष ,मी विधानसभा बोलतेय, विधानसभेचा सिग्नल, युथ बुथ, चुनाव पाठशाला, मतदार साक्षरता क्लब, टॉक विथ कलेक्टर, सेल्फी पॉइंट, शिक्षक निवडणूक प्रशिक्षण आदी स्वीप समितीच्या विविध उपक्रमांमध्ये देखील संकल्पपत्र भरून घेण्यात आले होते.

संकल्प पत्राचे दोन भाग करण्यात आले होते यामध्ये पहिल्या भागात विद्यार्थ्यांनी पालकांना मतदान करण्याविषयी आवाहन होते.दूसऱ्या भागात पालकांनी स्वतः मतदान करू असा संकल्प करावयाचा असून त्याचबरोबर आसपासच्या परिसरातील इतर पात्र मतदारांना देखील मतदानासाठी प्रोत्साहित करू, अशा आशयाचा मजकूर संकल्प पत्रामध्ये होता.

त्याचबरोबर संकल्प पत्राबरोबर मतदार यादी मध्ये आपले नाव पाहण्यासाठी व मतदान केंद्राच्या अन्य माहितीसाठी डायल करा 1950, डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन व्ही एस पी डॉट इन, वोटर हेल्पलाइन, सुविधा, पीडब्ल्यूडी, सी विजिल या भारत निवडणूक आयोगाच्या प्रसार घटकांचा देखील समावेश संकल्प पत्रावर करण्यात आला होता.

संकल्पपत्रा वरील मजकूर पुढीलप्रमाणे होता “आम्ही असा संकल्प करतो की आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, नि: पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकांचे पावित्र्य राखून प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म ,वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करू तसेच आमच्या कुटुंबातील सर्व मतदार शेजारी व मित्रपरिवार यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करू.”

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button